राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेचे यजमानपद ‘शरद पॉलिटेक्निक’कडे
यड्राव (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यपट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये मंगळवार (ता. १७) मार्ट रोजी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय प्रकल्प (प्रोजेक्ट) स्पर्धा होणार आहेत. पदविका अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ह्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यातील चार पॉलिटेक्निकची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शरद पॉलिटेक्निकचा समावेश आहे.

तंत्रशिक्षण मंडळाकडून २०११ पासून राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमधील नवोपक्रम, तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता आणि संशोधन वृत्ती विकसित करण्यासाठी या स्पर्धेला महत्त्व दिले जाते. विद्यार्थ्यांना सादर करावयाच्या प्रकल्पांचा प्रकार उद्योग, समाज आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी जोडण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळून त्यांच्या तांत्रिक क्षमतांना व्यापक व्यासपीठ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यंदाच्या स्पर्धेसाठी १६ ते २० मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सर्व संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार विभागनिहाय चार प्रादेशिक केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे विभागासाठी शरद पॉलिटेक्निकची निवड करण्यात आली आहे. तसेच मुंबई विभागासाठी ठाणे येथे, नागपूर विभागासाठी यवतमाळ आणि औरंगाबाद विभागासाठी अहमदनगर येथे प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांचे मार्गदर्शनाखाली प्राचार्य बी.एस. ताशीलदार, उपप्राचार्य पी.एस.चौगुले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी स्पर्धेचे पूर्वनियोजन करीत आहेत.




