जिल्हा परिषदेची तालुकास्तरावर येत्या 13 व 14 मे रोजी आढावा बैठक

जिल्हा परिषदेची तालुकास्तरावर येत्या 13 व 14 मे रोजी आढावा बैठक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद अध्यक्षा व सर्व खाते प्रमुख, तालुकास्तरीय कार्यालय प्रमुख, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीत 13 व 14 मे रोजी तालुकास्तरावर  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार आहे.

   कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये गेली चार वर्ष प्रशासक कालावधी संपून पदाधिकारी निवडी होऊन गतिमान पद्धतीने कामकाज सुरू झाले आहे, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य हे ग्रामीण, डोंगराळ, वाड्या- वस्त्यांमध्ये विखुरलेल्या भागातील प्रतिनिधित्व करतात. 

   ग्रामीण भागातील नागरिक हे शासनाच्या योजनांसाठी बहुतांश वेळा तालुक्याच्या ठिकाणी जात असतात, त्यामुळे पंचायत समितीचे कामकाज गतिमान पद्धतीने झाले तरच शासनाच्या योजना ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना देऊ शकणार आहेत.

   त्यामुळे तालुका स्तरावरील अडीअडचणी जाणून घेऊन प्रशासन गतिमान करण्यासाठी  जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विषय समितीचे सभापती, पंचायत समिती सभापती, उपसभापती,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गट विकास अधिकारी, सर्व तालुका अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 पहिली आढावा बैठक 13 मे रोजी गडहिंग्लज व 14 मे रोजी  भुदरगड येथे पंचायत समितीमध्ये होणार आहे.तालुकास्तरीय कार्यालय प्रमुख, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. याबाबत अध्यक्षा खोत यांनी सांगितले की, पंचायत समितीकडून प्रस्ताव आला आणि जिल्हा परिषदेने मंजूर केला असे होंऊ नये. त्यासाठी तालुका पातळीवरच जाऊन तेथील प्रश्न, अडचणी, मागण्या यावर चर्चा केली जाणार आहे. त्या त्या तालुक्यांचे नेमके प्रश्न काय आहेत हे समजून घेऊनच पुढची कार्यवाही केली जाणार आहे.