राधानगरीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन थेट शेताच्या बांधावर; स्वतः पॉवर टिलर चालवत केली भात लावणी

राधानगरीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन थेट शेताच्या बांधावर; स्वतः पॉवर टिलर चालवत केली भात लावणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : राधानगरी तालुक्यात 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. जॅसमिन यांनी थेट शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात डॉ. जॅसमिन यांनी केवळ पाहणी न करता, स्वतः शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीकामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनी स्वतः पॉवर टिलर चालवून शेताची चिखलणी केली आणि त्यानंतर उपस्थित शेतकरी व महिलांसोबत भात रोपलावणीचा प्रत्यक्ष आनंद घेतला.

या दौऱ्यात आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींवर विशेष भर देण्यात आला. भात पिकातील कीड नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणारे पक्षी थांबे आणि चिकट सापळे शेतात लावण्याच्या कामातही डॉ. जॅसमिन यांनी सहभाग नोंदवला. तसेच, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या प्रसंगी वृक्षारोपणही करण्यात आले. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या अडचणी, शेतीपुढील आव्हाने आणि अपेक्षा जाणून घेतल्या. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा जास्तीत जास्त अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


या उपक्रमावेळी जिल्हा परिषद सदस्या अमृता डोंगळे, पंचायत समिती सदस्य संग्राम कलिकते, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, मंडळ कृषी अधिकारी अनिल भोपळे यांच्यासह जिल्हा परिषद, कृषी विभाग व ‘आत्मा’ संस्थेचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.