कृषी-पशुसंवर्धन विभाग म्हणजे खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्याचा आत्मा ; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रतिपादन

कृषी-पशुसंवर्धन विभाग म्हणजे खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्याचा आत्मा ; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रतिपादन

कोल्हापूर (प्रतिनिधी): "कोल्हापूर जिल्हा परिषदेचा कृषी व पशुसंवर्धन विभाग म्हणजे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा आत्मा आहे," असे गौरवोद्गार कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ च्या चारा उत्पादन कार्यक्रमांतर्गत, 'पशुधनातील संतुलित आहार व वैरण पिकांची लागवड' या विषयावर या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिल्पा खोत, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, उपाध्यक्ष तथा कृषी-पशुसंवर्धन व दुग्ध समितीचे सभापती तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, महिला बाल कल्याण सभापती विद्या पाटील, शिक्षण सभापती शितल यादव, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पशुधन प्रयत्नपूर्वक जोपासा; पालकमंत्र्यांचे आवाहन:

पालकमंत्री प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले असून येथे मोठी कृषी संपन्नता आहे. त्यामुळे या भागात पाळीव पशूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी आपले पशुधन प्रयत्नपूर्वक जोपासावे, तसेच दुग्ध व कृषी क्षेत्रातून स्वतःसह कुटुंबियांचे अर्थाजन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच लोकहिताची सच्ची चळवळ म्हणून शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यशाळेत उपस्थित पशुपालकांना तज्ज्ञांनी विविध विषयांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यामध्ये सहा. आयुक्त डॉ. सॅम लुद्रिक यांनी पशुधनातील आहाराचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केलं. सहा. आयुक्त डॉ. अविनाश चव्हाण यांनी निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा निर्मिती यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. तर पशुधन विकास अधिकारी डॉ. यशवंत उमरदंड (सांगरूळ) यांनी वंध्यत्व निवारणात चारा पिकांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. 

यावेळी प्रत्येक तालुक्यातून दोन याप्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मका बियाणांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. प्रमोद बाबर यांनी सांगितले की, आपल्या जिल्ह्यात सुमारे साडेआठ लाखांहून अधिक पशुधन आहे. तसेच सकस हिरवा चारा निर्मितीत कोल्हापूर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आघाडीवर आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रसाद भामरे यांनी केले.

या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व विभाग प्रमुख, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.