'एक दिवस माझ्या बळीराजासाठी'; कोल्हापूर जि. प. उपाध्यक्षांनी पेरणोलीत चालवला पॉवर टिलर, केली भात लावणी!
आजरा (प्रतिनिधी): "एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या विशेष उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी आजरा तालुक्यातील पेरणोली येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ मार्गदर्शनच केले नाही, तर स्वतः शेतात उतरून शेतकऱ्यांसोबत काम करत जिल्हा परिषद सदैव बळीराजाच्या पाठीशी राहून सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली.

पेरणोली ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच वनश्री देसाई आणि उपसरपंच संकेत सावंत यांच्या हस्ते उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.
शेतकऱ्यांसोबत थेट बांधावर: चिखलणी ते झुणका भाकरीचा आस्वाद
या उपक्रमादरम्यान उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी आजरा घनसाळ उत्पादक शेतकरी मारुती परीट यांच्या शेतात स्वतः पॉवर टिलर चालवून चिखलणी केली. त्यानंतर त्यांनी उत्साहाने भात रोप लावणीतही सहभाग घेतला. या कष्टानंतर त्यांनी शेतकऱ्यांसोबत शेताच्या बांधावर बसून पारंपरिक 'झुणका-भाकरी'चा आस्वाद घेतला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, "जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आजरा घनसाळ तांदळाची शुद्ध बियाणे निर्मिती, उत्पादन वाढ आणि त्याच्या योग्य मार्केटिंगसाठी (ब्रँडिंग) विशेष प्रयत्न केले जातील."




