रोजगार मेळाव्यातून युवकांना थेट नोकरीची संधी : विजयसिंह माने

रोजगार मेळाव्यातून युवकांना थेट नोकरीची संधी : विजयसिंह माने

हातकणंगले (प्रतिनिधी) : उद्योग व्यवसायांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम रोजगार मेळाव्यातून केले जाते. बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर थेट नोकरी मिळते. कुशल मनुष्यबळ विकसित होण्याबरोबरच रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी मेळावा उपयोगी ठरतो. ज्यांना नोकरी मिळेल, त्यांनी वेळेचे काटेकोरपणे पालन करीत उद्योगाशी कंपनी व्यवस्थापनाशी निष्ठा ठेवून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी केले.

वाठार येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर अकॅडमी व अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी सहायक आयुक्त जमीर करीम, संस्थेच्या संचालिका मनीषा माने प्रमुख उपस्थित होते.जमीर करीम म्हणाले, विविध क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या युवकांना नोकरी मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम या मेळाव्यातून केले जाते. युवकांच्या करिअरला दिशा देणारा हा उपक्रम आहे. शिक्षित, उत्तम कौशल्य असणाऱ्यांना संधी मिळते.

इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. संगीता चौगुले, कॅम्पस डायरेक्टर प्रवीण घेवारी यांची भाषणे झाली. यावेळी नामवंत २४ कंपन्याचे एचआर विभागातील अधिकारी यांनी पद व शिक्षण यानुसार मुलाखत घेत युवकांची निवड केली.डॉ. श्वेता रांजणे यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. अमोल पाटील यांनी आभार मानले. विविध शाखांतील प्राचार्य व जिल्ह्यातून युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.