सरकारचा मोठा निर्णय: MPSC अपयशी उमेदवारांसाठी 'निपुण सेतू' ठरणार गेमचेंजर
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील एमपीएससी (MPSC) परीक्षा अधिक पारदर्शक आणि गतीमान होण्यासाठी, उमेदवारांनी कुठल्याही अमिषाला बळी न पडता केवळ अभ्यास आणि परीक्षेवरच लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. युपीएससीच्या धर्तीवर आता एमपीएससी परीक्षेतही काही बदल आणि सुधारणा करण्यात आल्या आहेत. युपीएससीतील प्रतिभा सेतू प्रमाणे एमपीएससी निपुण सेतू सुरु करण्यात येईल. त्यामुळे परिक्षार्थी युवकांनी एकदा परिक्षा दिली की पुन्हा नोकरीसाठी परिक्षा देण्याची गरज नाही, त्यासाठी एमपीएससी पुर्वी 53 संवर्गासाठी परीक्षा घेत होती, आता 103 संवर्ग तयार करण्यात आले आहेत.

MPSC मार्फत शासनाच्या एका विभागातील नोकरीसाठी परिक्षा दिल्यानंतर दुसऱ्या विभागासाठी परिक्षा न देता वेटींग लिस्टचा उपयोग केला जाणार आहे. त्यातून खासगी कंपन्यांना देखील एमपीएससीमधील उमदेवारांना नोकर भरती करता येईल.
एमपीएससीच्या उमेदवारांसाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला असून अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांच्या रोजगारांना याचा लाभ मिळणार आहे. युपीएससीच्या प्रतिभा सेतूच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरु करण्यात येईल. भाजप आमदार विक्रम सिंह पाचपुते यांनी यासंदर्भात मागणी केली होती. राज्य सरकारने या मागणीची दखल घेतली असून सामान्य प्रशासन विभागाने निपुण सेतू पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांची यादी सार्वजनिक व खासगी संस्थांना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, म्हणजेच खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात या उमेदवारांना नोकरीची संधी मिळू शकते. महाजॉब्स पोर्टल अंतर्गत निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात येईल.
निवड न झालेल्या उमेदवारांसाठी “निपुण सेतू” उपक्रम- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मुलाखत फेरीपर्यंत पात्र ठरलेल्या परंतु अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिभा सेतू पोर्टल सुरू केले आहे. त्याच धर्तीवर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अंतिम निवडीसाठी शिफारस न झालेल्या उमेदवारांची माहिती सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील संस्थांना उपलब्ध करून देण्यात येणार. त्यासाठी महाजॉब्स पोर्टलअंतर्गत “निपुण सेतू” हा उपक्रम सुरू करण्यात येणार.




