सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार यांनी बारामती पिंजून काढली

सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार यांनी बारामती पिंजून काढली

पुणे (प्रतिनिधी) : बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ घोंगडी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातून घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, भगिनी सई पवार देखील उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आमदार रोहित पवारांनी म्हटलं की, आजपर्यंत प्रचार असेल तर तो साहेबांचा असायचा, दादांचा असायचा. मी लहान असताना मी अजित दादांच्या प्रचारासाठी सायकल रॅली काढली होती. दादांनी मला जिल्हा परिषदला तिकीट दिलं होतं. त्यावेळी दादा निर्णय घेत होते. मी इथून उभा राहिलो होतो. आज पवार साहेबांमुळे हा परिवार आहे, पण नंतरच्या काळात अनेक नेते आहेत, महाराष्ट्रात जे अजित दादांमुळे आहेत, आल्या आल्या अजित दादांच्या फोटोला हात जोडावे लागतील असं स्वप्नात वाटलं नव्हतं. आता आपला नेता पुन्हा दिसणार नाही. मी दुसऱ्या पक्षात असलो तरी दादांचा मी फॅन होतो, ते माझे काका होते, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. 

ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पवार साहेबांपासून अनेकांनी प्रयत्न केले. मोठ्या पक्षांनी उमेदवार दिला नाही. पण अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी उभा राहायला नको होतं, आपल्या गावातून एक सुद्धा मत अपक्ष उमेदवारांना होणार नाही याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. सर्व ९९ टक्के मतदान सुनेत्रा पवारांना होईल यासाठी प्रयत्न करा. दादांकडे बघून मी प्रचारासाठी आलो आहे. जे बाहेरून आलेत त्यांना एक सुद्धा मत मिळाले नाही पाहिजे. बाकी काही गोष्टी आमच्या मनात आहेत. काही घटना घडल्या त्याची उत्तर अनुत्तरित आहेत. साडेनऊची वेळ होती, आज आपण लवकर आलो कदाचित ती दादांची स्टाईल असावी, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे. 

मला काही अधिकारी सांगतात, आम्हाला आजही वाटत की, आज दादांचा फोन येईल आणि सांगतील आपल्याला तिथे भेट द्यायची आहे. जिल्हा परिषदेच्या प्रचाराला येताना ती घटना घडली. तुमच्या आमच्या मनात दादांचं नाव हे कायम स्वरुपी राहणार आहे, बारामतीकरांना फार सांगायची गरज नाही, त्यांना काय करायचं हे माहित असतं, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.