हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र मोहिमेला कोल्हापूर पोलिसांचा हातभार; शाहूपुरी पोलीस ठाण्यांतर्गत ७५ वृक्षांची लागवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : वाढते शहरीकरण, औद्योगीकरण आणि जागतिक तापमान वाढीसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी तसेच राज्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्य शासनाच्या "हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र" या मोहिमेअंतर्गत २०२६ ते २०४७ या २१ वर्षांच्या कालावधीत राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरवर्षी १५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ 'वन महोत्सव' म्हणून साजरा केला जातो.

याच मोहिमेचे औचित्य साधून माननीय पोलीस अधीक्षक निलोत्पाल सर यांच्या आदेशानुसार, कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला १० हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या मोहिमेला गती देत शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोळीबार मैदान, कसबा बावडा येथे ७५ वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली.
हा वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी शहर उपविभागाच्या माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील मॅडम, शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत काकंडकी व शितल डोईजड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव व अभिजीत आटपाडकर, सहाय्यक फौजदार विजय पाटील, आणि पोलीस हवालदार, शिवाजी पाटील यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि कोल्हापूरला अधिक सुंदर व हिरवेगार बनवण्यासाठी शाहूपुरी पोलीस दलाने उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.




