७५ वर्षांचे वय नेतृत्वाचे नव्हे, तर निवृत्तीचे; वाढदिवसानिमित्त संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना सल्ला

७५ वर्षांचे वय नेतृत्वाचे नव्हे, तर निवृत्तीचे; वाढदिवसानिमित्त संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना सल्ला

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना एका वेगळ्याच अंदाजात सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदींना ७६ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, "७५ वर्षे हे वय नेतृत्वाचे नसून निवृत्तीचे आहे. त्यांनी आता देशाचे नेतृत्व न करता राजकारणातून निवृत्त व्हावे," असा चिमटा राऊतांनी काढला आहे. तसेच, "त्यांची स्वतःची प्रकृती कशी आहे हे माहीत नाही, पण या देशाची प्रकृती मात्र बिघडली आहे," अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.

    एकनाथ शिंदेंवर निशाणा

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुजरातमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यावरून राऊतांनी शिंदेंवर टीकेची झोड उठवली. "एकनाथ शिंदेंचे नेते नरेंद्र मोदी असून त्यांचे पक्षप्रमुखही तेच आहेत. त्यांच्या पक्षाचे मुख्यालयच गुजरातमध्ये आहे, त्यामुळे त्यांना तिथे जावे लागते. यावरून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्यांचे नेते बाळासाहेब ठाकरे नसून मोदी आहेत," असे राऊत म्हणाले.

    मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया

    मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण सोडले, यावरही राऊतांनी भाष्य केले. "जर जरांगे आणि सरकारचे समाधान झाले असेल, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी एका बाजूला जरांगे यांच्याविरोधात भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे त्यांच्या मनधरणीसाठी जायचे, ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे," असा गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला.