आधी मोदींनी त्यांची डिग्री दाखवावी"; अभिजीत दिपके यांची थेट प्रतिक्रिया
मुंबई (प्रतिनिधी) : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केली होती. या मागणीवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना दिपके म्हणाले, आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची शैक्षणिक पदवी सार्वजनिक करावी. त्यानंतर मी माझ्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा आणि शैक्षणिक खर्चाचा संपूर्ण तपशील जाहीर करेन. माझी पदवी खरी आहे आणि नरेंद्र मोदी यांचीही खरी असेल, अशी मला आशा आहे.
5 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या बैठकीला पक्षाचे प्रवक्ते आणि आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, संघटनेचा पुढील रोडमॅप आणि भविष्यातील दिशा यावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिपके म्हणाले, गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेते मला भेटले आहेत. मात्र, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नाही. गरज पडल्यास मी पुन्हा जंतर-मंतरवर जाऊन आंदोलन करेन.
राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, "सध्या तरी नवीन पक्ष स्थापन करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. आम्हाला ही जनचळवळ म्हणूनच पुढे न्यायची आहे. आजच्या राजकारणात लोकांचा विश्वास कमी झाला आहे. निवडणूक प्रक्रिया, पक्षांतर आणि तपास यंत्रणांच्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत नवीन पक्ष स्थापन करून काय साध्य होणार, हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे," असेही अभिजीत दिपके यांनी म्हटले.




