उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार - बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील

गारगोटी (प्रतिनिधी) - मी शिवसेनेचे शिवबंधन सोडून स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असून हातातील 'मशाल' सोडून आता 'घड्याळ' बांधण्याचा निर्णय घेतला आहे. माझा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश निश्चित झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मी मुदाळला २३ मे ला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते पक्षप्रवेश करणार असणार अशी माहिती बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
के. पी. पाटील पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या कारणावरून मी शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) प्रवेश केला होता आणि शिवसेनेतून उमेदवारी लढविली होती. मात्र मला पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची आलेली सत्ता आणि या कारणाने कार्यकर्त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेत मी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. मी '४० वर्षांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत नेहमीच कार्यकर्त्यांना जपण्याचे काम केले. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीने मला निर्णय घ्यावा लागला. कार्यकर्त्यांची इच्छा व मानसिकता लक्षात घेऊन त्यांचा माझ्यावरील विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी विनाअट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
१९८५ पासून राजकीय जीवनात काम करताना ८० ते ९० हजार लोक नेहमीच सोबत राहिले आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी मी सदैव प्रयत्न केले. यापुढेही त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न सोडवण्यासाठी मी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहे.'
या पत्रकार परिषदेला बिद्री साखर कारखान्याचे संचालक पंडितराव केणे, माजी सभापती विश्वनाथ कुंभार, प्रा. एच. आर. पाटील, मच्छिंद्र मुगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.