ऊस दरावरून संघर्ष पेटणार! साखर उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी मैदानात

ऊस दरावरून संघर्ष पेटणार! साखर उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी मैदानात

सांगली, कोल्हापूरसह कर्नाटकमधील कारखानदारांच्या भेटीगाठी सुरू

कोल्हापूर/प्रतिनिधी: केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील साखर उद्योग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या उद्योगाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट कारखानदारांच्या दारात जात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. राजू शेट्टी सध्या कोल्हापूर, सांगली आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील प्रमुख साखर कारखानदारांच्या गाठीभेटी घेत असून, या लढ्यात एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत.

सरकारच्या दबावाला बळी पडून मागण्या मान्य होण्यापूर्वीच १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास, शेतकरी आणि कारखानदारांमधील संघर्ष अटळ असेल, असा थेट इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या:

कारखानदारांना दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र व राज्य सरकारकडे खालील प्रमुख मागण्यांवर एकजुटीने पाठपुरावा करण्याचा आग्रह धरला आहे.

साखरेचा किमान हमीभाव
(
MSP):
साखरेचा हमीभाव प्रति किलो ५० रुपये निश्चित करण्यात यावा.

इथेनॉलचे दर आणि निर्बंध:
'
सी-हेव्ही' इथेनॉलचा दर प्रति लिटर ७० रुपये करावा आणि इथेनॉल निर्मितीवरील जाचक निर्बंध तत्काळ उठवावेत.

सवलतीच्या दरात कर्जाची सोय:
केंद्र सरकारने नाबार्ड, एसडीएफ (SDF) फंड किंवा एनसीडीसी (NCDC) अंतर्गत खासगी व सहकारी साखर कारखान्यांना वार्षिक ४ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे.

व्याज सवलत व हप्त्याला मुदतवाढ:
केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर घालण्यात आलेल्या बंदीमुळे प्रकल्पांच्या कर्जाचा व व्याजाचा मोठा भार कारखान्यांवर आला आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभराची व्याज सवलत आणि कर्जाच्या हप्त्यांसाठी मुदतवाढ योजना जाहीर करावी.

"हा संघर्ष केवळ शेतकऱ्यांचा नाही, तर कारखानदारी वाचवण्याचा"

आपली भूमिका मांडताना राजू शेट्टी म्हणाले, "हा लढा केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित नसून संपूर्ण साखर कारखानदारी वाचवण्यासाठी आहे. साखरेचे आणि इथेनॉलचे दर वाढले, तरच कारखाने टिकतील आणि तरच शेतकरी जगू शकेल. त्यामुळे कारखानदारांनी सरकारच्या दबावाला बळी न पडता, मागण्या मान्य होईपर्यंत कारखाने सुरू करू नयेत."

 कर्नाटक सीमाभागातील कारखाने आधी सुरू झाल्यास महाराष्ट्रातील ऊस तिकडे पळवला जाण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी राजू शेट्टी यांनी कर्नाटक सीमाभागातील कारखानदारांशीही थेट चर्चा करून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कारखानदार एकत्र आल्यास ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.