'ऑपरेशन टायगर'नंतर नितेश राणेंचा ठाकरे पिता-पुत्रांवर हल्लाबोल; "आदित्य ठाकरेंना हेल्मेट पाठवणार''
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीत झालेल्या कथित 'ऑपरेशन टायगर'मुळे ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू असतानाच राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या तयारीत होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचे रक्षण करण्यासाठीच सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना राणे म्हणाले, "तृणमूल काँग्रेसमध्ये जसे अभिषेक बॅनर्जी आहेत, तसेच ठाकरे गटात आदित्य ठाकरे आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खासदार पक्ष सोडून का गेले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जी यांना हेल्मेट घालून फिरण्याची वेळ आली होती, त्यामुळे महाराष्ट्रात फिरताना गरज पडल्यास आदित्य ठाकरेंनाही हेल्मेट पाठवावे लागेल."
पुढे बोलताना त्यांनी दावा केला की, आदित्य ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात अनेक बैठका झाल्या होत्या. तसेच आदित्य ठाकरे यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्याबाबतही चर्चा सुरू होती. त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारांशी बांधिलकी असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.महाविकास आघाडी, रोहित पवार आणि संजय राऊत यांच्यावरही राणे यांनी टीकेची झोड उठवली. "बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जाणाऱ्यांना शिवसैनिकांनी स्वीकारले नाही. त्यामुळेच अनेक नेते आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले," असे ते म्हणाले.
तसेच, "गद्दारांच्या संरक्षणासाठी पोलीस सुरक्षा दिल्याची टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावे," असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.दरम्यान, नितेश राणे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.




