कथित हत्या आणि बॉम्ब धमकी प्रकरणी चौकशीची मागणी; राऊत आक्रमक
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय पाटील यांच्या कथित वक्तव्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.राऊत यांनी आपल्या पत्रात दावा केला आहे की, संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांविरोधात आक्षेपार्ह आणि धमकीवजा वक्तव्ये केली. त्यामध्ये "मी याआधी 5 लोकांना ठार केले आहे" तसेच "माझ्याविरोधात आंदोलन केल्यास बॉम्ब टाकेन आणि घरात घुसून मारेन" अशा प्रकारची विधाने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर, पाटील यांच्या वक्तव्यांची सखोल चौकशी व्हावी, संबंधित आरोपांमध्ये तथ्य आहे का याचा तपास करावा आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.राऊत यांनी पत्रात असा सवालही उपस्थित केला की, जर अशा प्रकारची विधाने खरोखर करण्यात आली असतील, तर त्यामागील परिस्थिती आणि त्यांचे स्वरूप तपासले जाणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणात दहशतवादविरोधी यंत्रणांची मदत घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिकृत तपास किंवा निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दावे आणि आरोप हे सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या स्वरूपातच पाहिले जात आहेत.राऊत यांनी पोलिसांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी, अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशाराही दिला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.




