केएल राहुलचं जबरदस्त शतक; पंजाबचे गोलंदाज हतबल
मुंबई (प्रतिनिधी) : अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने फलंदाजीचा थरार सादर केला. सलामीवीर पाथुम निसांका (11धावा) स्वस्तात बाद झाल्यानंतर, केएल राहुल आणि नितीश राणा यांनी पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

कर्णधार केएल राहुलने आज आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक साकारली. त्याने अवघ्या 67 चेंडूंमध्ये नाबाद 152 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 9 षटकार मारले. राहुलच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पंजाबचा कोणताही गोलंदाज प्रभावी ठरला नाही.
दुसऱ्या बाजूला नितीश राणाने केएल राहुलला तोडीस तोड साथ दिली. राणाने केवळ 44 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 91 धावांची स्फोटक खेळी खेळली. झेवियर बार्टलेटने त्याला बाद केले, मात्र तोपर्यंत दिल्लीने विशाल धावसंख्या गाठली होती. डेव्हिड मिलर 3 धावांवर नाबाद राहिला.
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसाठी आजचा दिवस विसरण्याजोगा ठरला. अर्शदीप सिंग आणि झेवियर बार्टलेट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला खरा, मात्र त्यांनी मोठ्या प्रमाणात धावा खर्च केल्या.




