घर गहाण ठेवून दिग्दर्शक झाला कंगाल, 1 कोटींचा फ्लॉप चित्रपट नंतर ठरला...

घर गहाण ठेवून दिग्दर्शक झाला कंगाल, 1 कोटींचा फ्लॉप चित्रपट नंतर ठरला...

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी सिनेमात अनेक मोठे चित्रपट आले, प्रचंड बजेट खर्च झाले, चर्चा रंगल्या पण काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळले. मात्र त्याच चित्रपटांनी नंतर इतिहास घडवला. आज आपण अशाच एका चित्रपटाची गोष्ट जाणून घेणार आहोत. ज्याने सुरुवातीला अपयश पाहिलं, पण नंतर कल्ट क्लासिकचा दर्जा मिळवला. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय, त्याचं नाव आहे ‘मेरा नाम जोकर’.1970 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात राज कपूर मुख्य भूमिकेत होते. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय सगळं काही राज कपूर यांनीच केलं होतं.

हा चित्रपट हिंदी सिनेमातील एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. मात्र, रिलीजच्या वेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. ‘मेरा नाम जोकर’ तयार करण्यासाठी तब्बल 6 वर्षांचा कालावधी लागला. त्या काळात इतक्या मोठ्या स्केलवर चित्रपट बनवणं ही मोठी गोष्ट होती. या चित्रपटासाठी राज कपूर यांनी जवळपास 1 कोटी रुपये खर्च केले होते,जे त्या काळात प्रचंड मोठं बजेट मानलं जात होतं.

इतकंच नाही, तर हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःचं घरही गहाण ठेवलं होतं. त्यांनी आपली जवळजवळ संपूर्ण संपत्ती या चित्रपटावर खर्च केली. या चित्रपटाची लांबीही तितकीच चर्चेत होती. ‘मेरा नाम जोकर’ सुमारे 4 तास 15 मिनिटांचा होता. त्यामुळे हा चित्रपट 3 भागांत विभागण्यात आला आणि त्यात एक नव्हे तर 2 इंटरवल होते. यापूर्वी 1964 मध्ये आलेल्या ‘संगम’ चित्रपटातही दोन इंटरवल होते. त्यामुळे ‘मेरा नाम जोकर’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. पण इतकी तयारी असूनही हा चित्रपट थिएटरमध्ये अपयशी ठरला.

18 डिसेंबर 1970 रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आणि मोठ्या अपेक्षांनंतरही बॉक्स ऑफिसवर कोसळला. यामुळे राज कपूर कर्जबाजारी झाले. यानंतर त्यांनी या चित्रपटाचे हक्क सोवियत संघाला विकले. तिथे मात्र या चित्रपटाने जबरदस्त यश मिळवलं. रशियात ‘मेरा नाम जोकर’ने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत सुमारे 16 कोटींपर्यंत गेला. सुरुवातीला फ्लॉप ठरलेला हा चित्रपट नंतर हिंदी सिनेमातील एक महत्त्वाचा कल्ट क्लासिक ठरला. या चित्रपटाची कथा ख्वाजा अहमद अब्बास यांनी राज कपूर यांच्यासोबत लिहिली होती. चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली. तसेच ऋषि कपूर, सिमी गरेवाल यांसारखे कलाकारही यात झळकले होते.