अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 मुंबई - अभिनेत्री शेफाली जरीवालाचं वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. छातीत वेदना जाणवू लागल्यानंतर शेफालीला तिचे पती पराग त्यागी यांनी मुंबईतील बेलेव्यू मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, शेफालीच्या मृत्यूचं कारण कार्डियक अरेस्ट असल्याचं सांगितलं जात आहे. तरीही, याबाबत अधिकृत वैद्यकीय निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर, फॉरेन्सिक टीमनं शेफालीच्या राहत्या घरी जाऊन तपास केला असून, पोलीसही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

घटनेनंतर शेफालीच्या घरी फॉरेन्सिक टीम आणि मुंबई पोलिस दाखल झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे तिच्या मृत्यूभोवती अनेक शंका-कुशंका उपस्थित होत आहेत. पोलिसांकडून कुटुंबीय आणि घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हॉस्पिटलमधील रिसेप्शन स्टाफच्या म्हणण्यानुसार, शेफालीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, तेव्हाच तिचं निधन झालं होतं. तिचा मृतदेह सध्या कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

शेफाली जरीवाला हिनं 2002 मध्ये ‘कांटा लगा’ या म्युझिक व्हिडिओमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर ती ‘बिग बॉस 13’, ‘नच बलिए’ यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली होती. याशिवाय, तिनं 'मुझसे शादी करोगी' सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं होतं.