जपानचा धुव्वा उडवत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये; शेफालीचा वादळी खेळ, अवघ्या 5 षटकांत विजय
India vs Japan Asian Games 2026 : 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने विजयी सुरुवात केली आहे. क्वार्टरफायनल सामन्यात भारताने जपानचा 8 विकेट्सनी पराभव करत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. जपानने दिलेले अवघे 58 धावांचे लक्ष्य भारताने केवळ 5 षटकांत पूर्ण केले. भारताच्या विजयात गोलंदाजीत श्री चरणी, तर फलंदाजीत शेफाली वर्मा चमकली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या जपानचा संपूर्ण डाव भारतीय गोलंदाजांनी 57 धावांत गुंडाळला.

श्री चरणीची भेदक गोलंदाजी
नाणेफेक जिंकून भारताने जपानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांसमोर जपानच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. श्री चरणीने शानदार गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतल्या.
शेफाली वर्मानेही गोलंदाजीत आपला ठसा उमटवत 4 षटकांत 13 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे जपानचा डाव अवघ्या 57 धावांवर संपुष्टात आला.
शेफाली वर्माचा वादळी खेळ
58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. गुनालन कमालिनीला खातेही उघडता आले नाही, तर भारती फुलमाळीने 6 धावा केल्या.यानंतर शेफाली वर्माने मैदानात येताच सामन्याचे चित्र बदलले. तिने अवघ्या 15 चेंडूंमध्ये 40 धावांची आक्रमक खेळी केली. तिच्या या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
दुसऱ्या बाजूला ऋचा घोषनेही आक्रमक फलंदाजी करत 6 चेंडूंत 12 धावा केल्या. त्यामुळे भारताने अवघ्या 5 षटकांत लक्ष्य गाठत सामना 8 विकेट्सनी जिंकला.
सेमीफायनलमध्ये भारताची बांगलादेशशी लढत
या विजयासह भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 20 सप्टेंबरला सेमीफायनलचे सामने होणार असून भारताचा दुसरा सामना बांगलादेशशी, तर पाकिस्तानची लढत श्रीलंकेशी होणार आहे.




