जि. प. च्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे समायोजन

जि. प. च्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे समायोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर विभागातील अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेत कोल्हापूर शिक्षण विभागाने अत्यंत प्रभावीपणे काम केले  आहे. सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार, जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन शिक्षणाधिकारी  सुवर्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे.

समायोजन प्रक्रियेत शिक्षण विभागाने अत्यंत पारदर्शक पद्धतीने  शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  पुनर्वसन केले  आहे. यामध्ये एकूण ४७ अतिरिक्त शिक्षकांपैकी ३२ शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात आले, तर उर्वरित १५ शिक्षकांचे त्यांच्याच मूळ संस्थेत (संस्थांतर्गत) समायोजन करण्यात आले आहे.

      वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल अशा एकूण १९ कर्मचाऱ्यांपैकी १२ जणांचे समायोजन पूर्ण झाले असून, उर्वरित ७ जणांचे संस्थांतर्गत समायोजन करण्यात आले आहे. तसेच अतिरिक्त ठरलेल्या १९ शिपायांचे समायोजन वरिष्ठ कार्यालयाकडील निर्देश नुसार  पूर्ण केले जाणार आहे.

      जिल्ह्यातील ११ शाळा विद्यार्थी अभावी ‘शून्य शिक्षक’ स्थितीत गेल्या आहेत. या शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही समायोजन करण्यात आले आहे. संबंधित शिक्षकांनी त्यांच्या मूळ शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा व शालेय दप्तराचे रितसर हस्तांतरण करून १५ जूनपर्यंत नवीन शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सात दिवसांच्या आत आपल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे अनिवार्य आहे.सदर प्रक्रियेसाठी अधिकृत आदेश पारित करण्यात आले. या समुपदेशन प्रक्रियेवेळी जिल्ह्यातील विविध माध्यमिक शिक्षक संघटनांचे   एस. डी. लाड, दादासाहेब लाड, राहुल पवार, आर. वाय. पाटील, मिलिंद पांगरेकर, बाबा पाटील, राजेंद्र कांबळे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

        या संपूर्ण प्रक्रियेत पाळलेली पारदर्शकता आणि प्रभावी नियोजनाबद्दल सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षणाधिकारी  सुवर्णा सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.