जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार ; ज्याच्याकडून आलिशान गिफ्ट मिळाल्या
मुंबई (प्रतिनिधी) : तब्बल 200 कोटी रुपयांच्या हाय-प्रोफाईल मनी लाँड्रिंग प्रकरणात एक नवीन कायदेशीर वळण आलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात माफीची साक्षीदार बनण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात सुकेश चंद्रशेखरचा समावेश आहे, ज्याच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. जॅकलिन फर्नांडिस ही सुकेश चंद्रशेखरची गर्लफ्रेंड आहे. सुकेशने तिला आतापर्यंत कोट्यवधींच्या वस्तू भेट केल्या आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिनच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. ईडीने न्यायालयाला सांगितले की, याचिका अस्पष्ट आणि अपूर्ण असून, उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. न्यायालयाने ईडीची विनंती मान्य केली आणि उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला. जॅकलिनने न्यायालयाला सांगितले की, तिची तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची आणि सत्य उघडकीस आणण्यास मदत करण्याची इच्छा आहे. माफीच्या साक्षीदाराचा दर्जा दिल्यास, ती तपासात आरोपींपासून वेगळी होऊन साक्षीदार बनू शकेल. ही प्रक्रिया न्यायालयाची मंजुरी आणि ईडीच्या संमतीवर अवलंबून आहे.
या प्रकरणात अंदाजे 200 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा समावेश आहे. सुकेश चंद्रशेखरवर उच्चभ्रू व्यक्तींना लक्ष्य करून बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणेचा दावा आहे की, या प्रकरणात मोठे व्यवहार आणि महागड्या भेटवस्तूंचा वापर करण्यात आला. जॅकलिन फर्नांडिस या प्रकरणात बऱ्याच काळापासून चौकशीला सामोरे जात आहे. तिने यापूर्वी दावा केला आहे की, तिला सुकेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल माहिती नव्हती आणि खोट्या माहितीच्या आधारे तिला यात गोवण्यात आले. आता, ईडीचे न्यायालयातील उत्तर आणि पुढील सुनावणी या प्रकरणाची दिशा ठरवेल.




