गडमुडशिंगीत खाजगी सावकारावर गुन्हा दाखल; व्याजाच्या वसुलीसाठी करत होता महिलेवर अत्याचार

गडमुडशिंगीत खाजगी सावकारावर गुन्हा दाखल; व्याजाच्या वसुलीसाठी करत होता महिलेवर अत्याचार

उचगाव (प्रतिनिधी): व्याजाच्या वसुलीसाठी महिलेवर शारीरिक अत्याचार आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी खाजगी सावकार अमित कृष्णात सावंत (रा. गडमुडशिंगी, तालुका करवीर) याच्या विरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

याबाबतची माहिती अशी संबंधित पीडित महिला सामाजिक संस्थेत कामावर आहे. 2023 मध्ये आर्थिक अडचणींमुळे या महिलेने अमित सावंत कडून दोन लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. अमित सावंत हा कारवर चालक म्हणून काम करतो. सुरुवातीचे काही महिने नियमित व्याज दिल्यानंतर या महिलेची आर्थिक अडचण वाढत गेली. या महिलेच्या अशा झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्याकडे अमित सावंत याने शरीर सुखाची मागणी केली.महिला एकटी घरी असल्याचे पाहून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले तसेच त्याचे चित्रीकरण केले. यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्याने महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. 

         पीडित महिलेने कर्जापोटी व्याजासह दोन लाख दहा हजार रुपये परत केले होते, परंतु उर्वरित 25 हजार रुपयांसाठी खाजगी सावकाराने पीडितेवर अत्याचार करून व्हिडिओ कार मालकाला पाठवले.या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पीडित महिलेचा जावई गेला असता त्याला बेदम मारहाण करण्यात करण्यात केली. बदनामीच्या भीतीने शांत असलेल्या पिडितेने अखेरीस पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणाबाबत गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत.