मराठमोळा रोहित राऊत ठरला ‘I - Popstar’ चा पहिला विजेता
मनोरंजन विश्व - गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या I - Popstar या संगीत रिअॅलिटी शोचा शेवटी विजेता जाहीर झाला असून, मराठमोळा गायक रोहित राऊत याने पहिले विजेतेपद पटकावले आहे. हा शो अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर स्ट्रीम होतो. मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या आवाजाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारा रोहित पुन्हा एकदा रिअॅलिटी शोमध्ये चमकताना दिसला. मिळालेल्या संधीचं उत्तम सोनं करत, कोणताही स्टेज छोटा नसतो हे त्याने पुन्हा सिद्ध केलं.

अंतिम फेरीची सुरुवात स्पर्धकांच्या दमदार परफॉर्मन्सने झाली. चरण पथानियाने कॉन्सर्ट - स्टाईल परफॉर्मन्सने वातावरण रंगवले, तर गायिका राधिका भिडे हिने कुटुंबासमोर अप्रतिम सादरीकरण केले. सर्व परफॉर्मन्स पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण देश ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आला आणि विजेत्याची घोषणा झाली.
टॉप 2 मध्ये टीम किंगचा रिषभ पांचाल आणि टीम परमिशचा रोहित राऊत यांची निवड झाली. अखेरीस रोहितने पहिल्या I - Popstar चे विजेतेपद पटकावले आणि ७ लाख रुपये बक्षीस मिळवले. तर रनर - अप ठरलेल्या रिषभ पांचालला ३ लाख रुपये प्रदान करण्यात आले. दोघांनीही देशभरात मोठा चाहतावर्ग कमावला.
रोहित राऊत यापूर्वीही अनेक रिअॅलिटी शोमध्ये चमकला आहे. लहानपणी ‘मराठी लिटिल चॅम्प्स’ च्या पहिल्या पर्वातील सहभागामुळे तो मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला होता. आता त्याची लोकप्रियता देशभर पसरली आहे.
१८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या शोमध्ये किंग, आस्था गिल, आदित्य रिखारी आणि परमिश वर्मा परीक्षक होते. मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती, भोजपुरी अशा विविध भाषांतील गायकांनी आपली स्वतः ची गाणी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आणि मोठा सोशल मीडिया फॅनबेस तयार केला.




