ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांच्या निधनाच्या अफवा खोट्या ; जाणून घ्या सविस्तर
मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल (10 नोव्हेंबर) त्यांच्या प्रकृतीत काहीशी बिघाड झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली होती. यानंतर आज (11 नोव्हेंबर) सकाळपासून सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरू लागल्या. मात्र, या अफवा पूर्णपणे खोट्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून कालपेक्षा आज त्यांंची तब्येत सुधारली असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

धर्मेंद्र यांची मुलगी आणि अभिनेत्री इशा देओल हिने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं, पापा यांच्या प्रकृतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका. ते सध्या स्थिर आहेत आणि बरे होत आहेत.

धर्मेंद्र यांची पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी खोट्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, जे घडत आहे ते अक्षम्य आहे. एक जबाबदार माध्यम उपचार सुरू असलेल्या व्यक्तीबद्दल अशा खोट्या बातम्या कशा पसरवू शकतं? हे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे. कृपया कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा.

धर्मेंद्र यांची वैयक्तिक माहिती -
पूर्ण नाव : धरम सिंह देओल
जन्म : 8 डिसेंबर 1935 (वय 88 वर्षे)
जन्मस्थान : साहनेवाल, पंजाब (ब्रिटिश भारत)
शिक्षण : वडील किशन सिंह देओल हे गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते.
कुटुंब -
पहिली पत्नी : प्रकाश कौर (1954 मध्ये लग्न)
मुले : सनी देओल, बॉबी देओल, विजयता, अजिता
दुसरी पत्नी : हेमा मालिनी (1980 मध्ये लग्न)
मुले : ईशा देओल, आहाना देओल
धर्मेंद्र यांची कारकीर्द -
अभिनय पदार्पण : दिल भी तेरा हम भी तेरे (1960)
चित्रपटसंख्या : 300 हून अधिक
गाजलेले चित्रपट : शोले, फूल और पत्थर, सत्यकाम, मेरा गाव मेरा देश, चुपके चुपके, धर्म वीर, रॉकी और रानी की प्रेम कहानी
निर्मिती संस्था : विजयता फिल्म्स – ज्याद्वारे त्यांनी सनी देओलला बेताब आणि बॉबी देओलला बरसात या चित्रपटांतून लॉन्च केलं.
राजकारण : 2004–2009 या काळात राजस्थानमधील बिकानेर मतदारसंघाचे भाजप खासदार.
सन्मान आणि पुरस्कार -
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार (1997)
पद्म भूषण (2012) – भारत सरकारकडून तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान.
धर्मेंद्र आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय असून, त्यांच्या अभिनयाची छाप चाहत्यांच्या मनात कायम आहे.




