‘दशावतार’ चा बॉक्स ऑफिसवर जलवा ; ६ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील भव्य आणि दर्जेदार कलाकृती ठरलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने रिलीज होताच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. चित्रपटगृहांमध्ये हाउसफुल शो आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद यामुळे ‘दशावतार’ने सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच तब्बल ५.२२ कोटींची कमाई केली होती, तर अवघ्या सहा दिवसांत हा आकडा ९.४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही घोडदौड पाहता ‘दशावतार’ मराठी बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे शिखर गाठण्याच्या वाटेवर आहे.

https://www.instagram.com/p/DOu4LlxDCsb/?utm_source=ig_web_copy_link
मुख्य अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे प्रेक्षकांचे विशेष आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले की, "‘दशावतार’ ला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यंत आनंददायी आहे. मराठी प्रेक्षकांनी आपल्या मातीतली कला जपून जगभर पोहोचवली आहे." तसेच त्यांनी चित्रपटाच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
१२ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीपासूनच दमदार ओपनिंग घेतली होती. पहिल्याच दिवशी ५० लाखांची कमाई, दुसऱ्या दिवशी १.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २ कोटी, तर चौथ्या दिवशी १ कोटींचे कलेक्शन झाले. आठवड्याच्या शेवटी एकूण कमाई ४.७५ कोटी झाली होती. महाराष्ट्राबरोबरच गोवा, बेळगाव, बंगळुरु, इंदौर आणि हैदराबादमध्येही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन सुबोध खानोलकर यांनी केले असून निर्मितीत सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन व मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांचा सहभाग आहे. दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, सुनील तावडे आणि आरती वडगबाळकर या कलाकारांनी आपापल्या भूमिका ताकदीने साकारल्या आहेत.
‘दशावतार’ चित्रपटात कोकणातील समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि लोककलेचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. तसंच पर्यावरणविषयक भाष्यही प्रेक्षकांना अंतर्मुख करतं. दमदार अभिनय, भव्य सेट्स, गाणी आणि थरारक कथानकामुळे प्रेक्षक चित्रपटगृहात खिळून राहतात. सध्या ‘दशावतार’ राज्यभरात ३२५ स्क्रीन्सवर ६०० शोजसह सुरू असून आठवड्याच्या शेवटी हा आकडा ९७५ शोपर्यंत पोहोचला आहे. या वेगाने ‘दशावतार’ मराठी चित्रपटसृष्टीतला एक मोठा यशोगाथा ठरणार हे निश्चित.




