देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा मध्यरात्री भेटीचा दावा; भाजपकडून फेटाळणी.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा मध्यरात्री भेटीचा दावा; भाजपकडून फेटाळणी.

मुंबई (प्रतिनिधी) : वर्षा निवासस्थानी बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हा दावा करण्यात आला आहे. मात्र या चर्चांना दोन्ही पक्षांनी दुजोरा दिलेला नाही. खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला. बैठक झाली का हे दोन नेतेच सांगू शकतील असं राऊत म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भेट झाल्याची चर्चा आहे. विधान परिषद बिनविरोध व्हावी यासाठी फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेटले असल्याची चर्चा आहे. मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून या चर्चेला दुजोरा मिळालेला नाही. ही बातमी खरी असल्याचा प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसचा दावा आहे.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही विधान परिषदेच्या अनुषंगाने भेटल्याचं सांगितलं जात आहे, या भेटीबाबत सध्या चर्चांना उधाण आलं आहे. तर मध्यरात्री झालेल्या या भेटीत फक्त विधान परिषदेची चर्चा झाली की अन्य कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. बुधवारी मध्यरात्री २ वाजता ही भेट झाल्याचा दावा केला जात आहे. एका ओळीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हा दावा करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कोणतीही भेट झालेली नाही. खोटी बातमी पसरवलेली आहे. अशा पद्धतीची कुठलीही भेट झालेली नाही, अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णतः निराधार, बिनबुडाच्या आणि धादांत खोट्या आहेत. ज्या समाजमाध्यम हॅण्डलवरून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, त्यांनाही कायदेशीर नोटीस देऊन कारवाई जाईल, असं भाजपचे मुख्य प्रवक्ता नवनाथ बन यांनी म्हटलं आहे.