पेपर लीक आंदोलनावर मोदींची मोठी घोषणा; अभिजित दीपकेंची खोचक प्रतिक्रिया चर्चेत
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपर लीक प्रकरणावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. सरकार आणि आंदोलकांमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, अशा प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. "देशातील युवकांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,"असेही त्यांनी नमूद केले.
या पोस्टनंतर काँकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेअर करत "Hi, my name is Nothing"असे लिहून टोला लगावला. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोने 23 जुलै रोजी सुरक्षा कारणास्तव 16 स्थानके तात्पुरती बंद ठेवण्याची घोषणा केली. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अभिजित दीपके म्हणाले, "मोदी संपूर्ण दिल्ली बंद करायला तयार आहेत, पण धर्मेंद्र प्रधान यांना हटवायला नाही."
तसेच, आंदोलनात बाहेरून लोक पाठवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या मते, आंदोलन तीव्र झाल्यानंतर मुद्दाम गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून, यामागे भाजप समर्थक असल्याचा त्यांनी दावा केला. या आरोपांवर संबंधित यंत्रणा किंवा भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.




