पोलिसांकडे ड्रग्ज येतात कुठून?' व्हायरल व्हिडिओवर सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील आंदोलनादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना कथितरित्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या व्हिडिओची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांकडे कठोर प्रश्न उपस्थित करत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रथम बळाचा वापर करण्यात आला आणि आता त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा समोर येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याकडून आंदोलक तरुणांना "खिशात ड्रग्ज ठेवून तुरुंगात टाकेन"अशा आशयाची धमकी दिल्याचे दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या व्हिडिओची अधिकृत सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.
सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. "जर पोलीस ड्रग्ज खिशात टाकण्याची भाषा करत असतील, तर त्यांच्याकडे अशी माहिती किंवा साधनं कुठून आली?" तसेच, "राज्य सरकारला अशा प्रकारची गुंडगिरी मान्य आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.याशिवाय, कोणालाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पुरावे तयार करणे किंवा अंमली पदार्थांचा गैरवापर करण्याची धमकी देणे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकारामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरही परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.दरम्यान, माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, व्हिडिओतील पोलीस कर्मचारी सायन पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर त्यांची बदली करण्यात आल्याची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.




