मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते "गाभ" चित्रपटाचे लेखक - दिग्दर्शक व निर्मात्यांचा सत्कार

कागल (प्रतिनिधी) - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये "गाभ" चित्रपटाचे लेखक - दिग्दर्शक अनुप जत्राटकर व निर्माते मंगेश गोटूरे यांचा सत्कार करण्यात आला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार मिळाल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते हा सत्कार झाला. या वास्तवदर्शी ग्रामीण चित्रपटाच्या निर्मितीबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी लेखक - दिग्दर्शक, निर्माते आणि सर्व कलाकारांचे कौतुक केले.
कोल्हापूरच्या मातीतला विषय घेऊन इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या 'गाभ' चित्रपटाने ६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले. या चित्रपटाला "कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट" व लेखक-दिग्दर्शक अनूप जत्राटकर यांना "कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक" असे दोन पुरस्कार मिळाले.
मुंबईत वरळी येथे मंगळवारी झालेल्या सोहळ्यात ज्येष्ठ निर्माते - दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला होता. 'गाभ" ला अंतिम फेरीतील १० उत्कृष्ट चित्रपट व उत्कृष्ट दिग्दर्शक गटात नामांकन मिळाले होते. उत्कृष्ट दिग्दर्शक गटात जत्राटकर यांना देण्यात आला.
ज्येष्ठ निर्माते - दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना 'कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक' पुरस्कार देण्यात आला. "गाभ" चित्रपटाचे निर्मात मंगेश गोटुरे यांना 'कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट' पुरस्कार दिला.
यावेळी केडीसीसी बँक संचालक प्रताप ऊर्फ भैय्या, शिवाजी विद्यापीठाचे जलसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, विकास पाटील, पंकज खलीप आदी मान्यवर उपस्थित होते.