‘महादेवी’ हत्तीणीबाबत वनतारा प्रशासनाने दिला सरकारच्या भूमिकेला पाठिंबा

मुंबई - नांदणी (ता. शिरोळ) येथील सर्वांच्या जिव्हाळ्याची ठरलेली ‘महादेवी’ हत्तीण परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून निर्णायक पावले उचलली जात आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील खासदार, आमदार तसेच स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "महादेवी हत्तीण गेली ३४ वर्षे नांदणी मठात आहे. ती पुन्हा तेथे यावी, ही आपल्या सर्वांची भावना आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि मठ मिळून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत." याच पार्श्वभूमीवर वनतारा प्रशासनानेही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, "मी मुंबईत वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) सुखरूप परत नांदणी मठात पाठवण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे."
वनताराच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, "आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. महादेवी हत्तीणीवर ताबा मिळवण्याचा आमचा हेतू नव्हता." त्यांनी हेही सांगितले की, नांदणी मठाजवळ हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास वनतारा आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करण्यास तयार आहेत. तसेच, विविध समाजांच्या धार्मिक भावना आम्ही समजून घेतो आणि त्यांचा सन्मान करतो," असेही वनताराच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.