उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीच्या दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्य मंत्रिमंडळाची नियमानुसार बैठक आज पार पडली असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, याच आठवड्यातला हा उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दुसरा दिल्ली दौरा ठरणार आहे. त्यांच्या या वारंवार दिल्ली भेटींमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच त्यांच्या गटातील मंत्र्यांच्या विरोधात तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याचं बोललं जात आहे. अलीकडेच मंत्री संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात स्वत:ला नोटीस आल्याचं जाहीरपणे सांगितलं, तर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही विरोधकांनी एका बार प्रकरणावरून टीका केली आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आज रात्रीचा दिल्ली दौरा विशेष लक्षवेधी ठरत आहे. याआधीही ते काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. विशेष म्हणजे 12 जुलै रोजी, विधीमंडळ अधिवेशन सुरू असतानाही, ते अचानक दिल्लीला रवाना झाले होते, आणि त्यांची ही भेट अगदी गुप्त ठेवण्यात आली होती. अगदी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनाही याची माहिती नव्हती.
उपमुख्यमंत्री शिंदे 30 आणि 31 जुलै रोजी संसदेच्या अधिवेशनादरम्यानही दिल्लीत उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी विविध खासदारांसोबत तसेच वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतल्या होत्या. काही राज्यांतील प्रमुख नेत्यांशीही त्यांनी चर्चा केल्याचं समजतं. आता पुन्हा एकदा ते दिल्लीच्या दौऱ्यावर जात असून, उद्या दुपारपर्यंत ते तिथे असतील. मात्र, त्यांच्या भेटीगाठी कुणासोबत होणार याबाबत अजून स्पष्टता नाही.
दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्यावर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती वेळा गावाला गेले आणि किती वेळा दिल्लीला गेले, याचा हिशोब ठेवा. १५ दिवसांत चंद्र बदलतो, तसं काहीसं त्यांचंही चाललंय,” असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
त्याचवेळी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील उद्यापासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्ली दौऱ्यात दोघंही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठीही उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं आहे.
या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याचं नेमकं कारण काय आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.