महापालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात ; ‘ईव्हीएम’ चा तुटवडा

महापालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात ; ‘ईव्हीएम’ चा तुटवडा

मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी आवश्यक कार्यवाही जवळपास पूर्ण केली असली, तरी प्रत्यक्ष मतदानासाठी लागणाऱ्या ‘ईव्हीएम’ (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स) चा तुटवडा एक गंभीर अडथळा ठरत आहे. मध्य प्रदेशातून ‘ईव्हीएम’ मागवण्याबाबत चर्चा सुरू असून, त्या वेळेत उपलब्ध झाल्यासच निवडणुका लवकर घेता येणार आहेत. अन्यथा, दहावी व बारावीच्या परीक्षांनंतर निवडणुका मार्च - एप्रिलदरम्यान घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीचा पुढील टप्पा ठरवणंही अडचणीत आलं आहे. सोडत काढण्यासाठी वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर न झाल्यास, हा कार्यक्रम दिवाळीनंतरच घेण्याची शक्यता आहे. सध्या नगर विकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. महानगरपालिकांची प्रभागरचना अंतिम झाली असून, त्यानुसार अध्यादेशही प्रसिद्ध झाला आहे. मतदार याद्यांचे बूथनिहाय विभाजन सुरू आहे. मात्र, आरक्षण निश्चित होण्यासाठी सोडत प्रक्रिया, त्यावर हरकती आणि सुनावणीसाठी किमान सात ते पंधरा दिवस लागणार आहेत. त्यामुळे जानेवारीच्या सुरुवातीला मतदान होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांकडून समजते.

दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा नेहमीपेक्षा 10-15 दिवस लवकर आयोजित केल्या आहेत. याचा परिणाम निवडणुकीच्या संभाव्य तारखांवर होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरअखेर घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, विविध अडचणींमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असून, आता ‘ईव्हीएम’ उपलब्धतेवरच निवडणुकांच्या तारखा ठरणार आहेत.