महाराष्ट्रात खरीप पेरण्यांना वेग! राज्यात 74% पेरणी पूर्ण; सोयाबीन, तूर आणि मक्याची स्थिती काय?
मुंबई (प्रतिनिधी) : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे महाराष्ट्रातील खरीप हंगामाची सुरुवात संथ झाली होती. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाचा जोर कमी असल्याने अनेक भागांतील शेतकरी चिंतेत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे.

कृषी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ऊस वगळता राज्यातील 74 टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. 20 जुलैअखेर सरासरी 144.36 लाख हेक्टर खरीप क्षेत्रापैकी 106.79 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, गेल्या वर्षी याच कालावधीत हीच आकडेवारी 88 टक्के होती.
सोयाबीन पेरणीबाबत बोलायचे झाल्यास, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत मिळून 113 टक्के पेरणी झाली आहे. लातूर विभागात 87 टक्के, अमरावती विभागात 88 टक्के, तर नागपूर विभागात 70 टक्के सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली आहे.
तूर पिकामध्ये नाशिक विभाग आघाडीवर असून येथे 121 टक्के पेरणी झाली आहे. पुणे विभागात 62 टक्के, कोल्हापूरमध्ये 83 टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात 86 टक्के, लातूर विभागात 57 टक्के, अमरावती विभागात 91 टक्के, तर नागपूर विभागात 78 टक्के तूर पेरणीची नोंद झाली आहे.
मका पेरणीतही नाशिक विभाग सर्वात पुढे असून येथे 128 टक्के लागवड झाली आहे. पुणे विभागात 88 टक्के, कोल्हापूरमध्ये 100 टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात 94 टक्के, लातूर विभागात 42 टक्के, अमरावती विभागात 142 टक्के, तर नागपूर विभागात 85 टक्के मका पेरणी झाली आहे.
एकूणच, अलीकडच्या पावसामुळे राज्यातील खरीप हंगामाला दिलासा मिळाला असून उर्वरित भागांमध्येही पेरण्यांचा वेग वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.




