महाराष्ट्रात पावसाचं कमबॅक! मराठवाडा-विदर्भात सरी; शेतकऱ्यांना दिलासा, हवामान विभागाचा मोठा अंदाज

महाराष्ट्रात पावसाचं कमबॅक! मराठवाडा-विदर्भात सरी; शेतकऱ्यांना दिलासा, हवामान विभागाचा मोठा अंदाज

राज्यातील काही भागांमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असून, पिकांसाठीही हा पाऊस काहीसा फायदेशीर ठरला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने विश्रांती घेतलेल्या मराठवाड्यात शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांतील काही भागांत पावसाची नोंद झाली. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसा आनंद पाहायला मिळाला.


 

भंडारा, वाशिममध्ये विजांसह पाऊस

विदर्भातील भंडारा आणि वाशिम जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत सुरू होता.सुमारे आठवड्याच्या विश्रांतीनंतर झालेल्या या पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला. भात आणि भाजीपाला पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरल्याचे सांगितले जात आहे.

वाशिम जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

२० ते २५ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढणार?

बंगालच्या उपसागरातील बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावर होण्याची शक्यता आहे. येत्या २० ते २५ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र आणि गोवा परिसरात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज  हवामान शास्त्रज्ञ यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे राज्यातील अनेक भागांना पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्येही पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यातही पावसाची शक्यता १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २१ सप्टेंबरला नाशिकमध्येही मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे.

अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २२ सप्टेंबरला मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहू शकतो.

महिनाअखेरीस राज्यात पावसाची चांगली हजेरी?

२१ ते २८ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या या पावसामुळे पावसाची कमतरता असलेल्या भागांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

पावसाच्या या संभाव्य पुनरागमनामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असून, पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजासाठी ही बातमी दिलासादायक ठरू शकते.