महाराष्ट्रात मतदार यादी पुनरीक्षणाला पुन्हा मुदतवाढ; आता 'या' तारखेला प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी!
मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण मोहिमेला निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता बूथ लेव्हल अधिकारी (BLOs) १७ ऑगस्टपर्यंत मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करतील. तर राज्याची अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) कार्यालयाने पावसाची स्थिती आणि तांत्रिक बाबी विचारात घेऊन वेळापत्रकात बदल करण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. ही विनंती मान्य करत आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
असे असेल नवे सुधारित वेळापत्रक (Schedule):
· घरोघरी जाऊन पडताळणी (BLO Verification): १७ ऑगस्टपर्यंत
· प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी (Draft Electoral Roll): २४ ऑगस्ट
· दावे व हरकती स्वीकारण्याची मुदत (Claims & Objections): २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर
· दावे व हरकतींचा निपटारा: २२ ऑक्टोबरपर्यंत
· अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी (Final Electoral Roll): २७ ऑक्टोबर
राजकीय पक्ष आणि नागरिकांना सूचना देण्याचे निर्देश
निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या सुधारित वेळेबाबत सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्वरित माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दूरदर्शन, वर्तमानपत्रे आणि डिजिटल माध्यमांद्वारे सर्वसामान्य जनतेला याबाबत अवगत करावे, असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना या बदलांची अधिकृत माहिती दिली जाणार आहे.
दुसऱ्यांदा मिळाली मुदतवाढ
विशेष पुनरीक्षण मोहिमेदरम्यान वेळापत्रक बदलण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १७ जुलै रोजी राज्यातील मुसळधार पावसामुळे घरोघरी पडताळणीची मुदत ८ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती आणि अंतिम यादीसाठी १९ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती. मात्र, कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने आता अंतिम यादी प्रसिद्धीची तारीख २७ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे.




