मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर FDA ची धाड; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, कॅन्टीन सील
मुंबई (प्रतिनिधी) : सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) राज्यभर धडाकेबाज कारवाया करत आहे. स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक आस्थापनांवर कारवाई केल्यानंतर आता FDA ने थेट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर छापा टाकत ते सील केले आहे.

या कारवाईमुळे बीएमसी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना तात्पुरता पर्याय शोधावा लागला असून, दररोज हजारो लोक वापरत असलेले हे कॅन्टीन बंद करण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती समोर आली आहे.
याआधीही FDA ने मुंबईतील के. रुस्तम आईस्क्रीम पार्लर, शालीमार रेस्टॉरंट, नूर मोहम्मदी रेस्टॉरंट तसेच पारशी डेअरी फार्म यांच्यावर स्वच्छतेच्या त्रुटींमुळे कारवाई केली होती. त्यामुळे राज्यभर अन्नसुरक्षेबाबत प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, नागरिकांना भेसळयुक्त अन्न किंवा बनावट व निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात तक्रार करणे अधिक सोपे व्हावे यासाठी FDA ने AI-आधारित नागरिक तक्रार पोर्टल सुरू केले आहे. या प्लॅटफॉर्मवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून तक्रार नोंदवता येते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तक्रार आपोआप तयार होते, संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते आणि तिच्या कार्यवाहीचा संपूर्ण मागोवा देखील घेता येतो.
तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे आणि नागरिकांच्या सहभागामुळे अन्नसुरक्षा अधिक प्रभावीपणे मजबूत करता येईल.




