'या' कारणानं राजकारण तापलं अन् उद्धव ठाकरेंनी केला सरकारवर हल्लाबोल

'या' कारणानं राजकारण तापलं अन् उद्धव ठाकरेंनी केला सरकारवर हल्लाबोल

मुंबई - संपूर्ण महाराष्ट्रभर नवरात्रीचा उत्साह असतानाच, राज्यात राजकीय घडामोडींनाही वेग येतो आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचं भव्य दसरा मेळावं मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार का, याबाबत उत्सुकता कायम असून, अद्याप त्यावर सस्पेन्स आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज अचानक पत्रकार परिषद घेत, राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवर सरकारला धारेवर धरलं. शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी करताना, त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

मी नुकतीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. या संकटाच्या काळात राजकारण न करता, आपण सर्वांनी एकत्र येऊन उपाययोजना शोधायला हव्यात, अशी विनंती मी सरकारला केली. मात्र सरकारकडून तसा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही," असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, "मुख्यमंत्री केवळ जाहिरातींत व्यग्र आहेत. एक उपमुख्यमंत्री मदतीच्या पाकिटांवर स्वतःचे फोटो छापून वाटप करण्यात गुंतले आहेत, तर दुसरे उपमुख्यमंत्री कुठेच दिसत नाहीत. जनतेला वेठीस धरण्याचं काम चालू आहे."

शेतकऱ्यांना नाही, साखरसम्राटांना हमी!

'शेतकऱ्यांवर सरकारचा पूर भार.' काही साखरसम्राट भाजपात गेल्यानंतर, त्यांच्या शेकडो कोटींच्या कर्जांना सरकारने हमी दिली. पण ज्यांनी जमीन, बैलजोडी, अगदी पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून कर्ज घेतलं, त्या शेतकऱ्यांना कोणतीही हमी नाही. सरकार फक्त श्रीमंतांनाच मदत करतं का? सामान्य शेतकरी भाजपात गेले तरच त्यांचं कर्ज माफ होणार का?" असा सवालही ठाकरे यांनी केला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर नवा भार

सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीका करताना ठाकरे म्हणाले, "अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी मदतीच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात 10 रुपये मदतीसाठी आणि 5 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कपात केली जाणार आहे. याला साखर संघानेही विरोध केला आहे. म्हणजे मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांवरच अधिक भार टाकला जातो आहे."

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंगत

उद्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार, तसेच राज ठाकरे सहभागी होणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.