वनमंत्री काय कामाचे?", शिंदेंना घेरणाऱ्या गणेश नाईकांवर निलेश राणे तुटून पडले
मुंबई (प्रतिनिधी):ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी नगरविकास खात्यावर आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरण्यास सुरूवात केली. नाईक आक्रमक झाल्यानंतर आता शिंदेसेनेकडून पलटवार करण्यास सुरूवात झाली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाईकांना आव्हान दिले. शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंनीही नाईकांना त्यांच्या खात्यातील कामांची आठवण करून देत पलटवार केला आहे.

शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे म्हणाले, "मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत. मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो. कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे."अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही. फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे नाहीत. साधनसामुग्री नाही. DFO दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही. लाकूडतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का असा प्रश्न पडायला लागलाय", असा सवाल करत निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या कामावरच शंका उपस्थित केली आहे.
पुढे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे की, "वन राहिलीच नाहीत, तर वनमंत्री काय कामाचे? जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले, तसे आता जंगल पोखरले जात आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही, ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो. वरील सगळे विषय गंभीर आहेत, पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत", अशा शब्दात निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या गणेश नाईकांवर पलटवार केला.




