वेळ पडली तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू ; लक्ष्मण हाकेंचा इशारा; गोपीचंद पडळकर अन् जरांगे पाटलांवरही साधला निशाणा

वेळ पडली तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू ; लक्ष्मण हाकेंचा इशारा; गोपीचंद पडळकर अन् जरांगे पाटलांवरही साधला निशाणा

मुंबई : राज्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईच्या दिशेने चाललेल्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगलीतील एका पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री, मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

ओबीसी आरक्षणावरून सरकारवर गंभीर आरोप:

आरक्षणाला धोका: 

ओबीसींचे आरक्षण संपले आहे, हा माझा दावा आहे," असा खळबळजनक आरोप करत लक्ष्मण हाके म्हणाले की, मागासवर्गीय समाजातील लोकांचे चुकीच्या पद्धतीने दाखले काढले जात आहेत. ओबीसी समाज असंघटित असल्याने केवळ मतांसाठी त्याचा वापर केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांवर टीका: 

मंत्र्यांनी जरांगे पाटील यांची वारंवार भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाचे बळ वाढवले. मुख्यमंत्री ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर दिशाभूल करत असून त्यांनी ओबीसी आरक्षणाचा 'जनरल वॉर्ड' करून ठेवला आहे," अशी टीका हाके यांनी केली.

मनोज जरांगे पाटलांना सवाल:

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलताना हाके म्हणाले, "जरांगे, तुमचा लढा मराठा समाजातील गोरगरीब लेकरांसाठी आहे, हे मान्य; पण ओबीसींच्या लेकराबाळांचा बळी देऊन तुम्हाला हा लढा जिंकायचा आहे का?" तसेच, खासदार विशाल पाटील यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दलही त्यांनी भाष्य केले.

गोपीचंद पडळकर आणि स्वतंत्र पक्षाबाबत इशारा:

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हाके म्हणाले की, "पडळकर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ते मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटमधील आहेत, मग ते आंदोलन कसे करू शकतात?"

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समाजानेच भूमिका घेतली पाहिजे. जर ओबीसी समाज पूर्णपणे एकत्र आला, तर अनेकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा इशारा देत "वेळ पडली तर आम्ही ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू," अशी घोषणा त्यांनी केली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही शेवटची टर्म असल्याचे सांगत त्यांनी 'डिलिमिटेशन कायदा' तातडीने लागू करण्याची मागणीही केली आहे.