'माझ्यासोबत काम हवं असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या'; प्रशांत किशोरांचा सुनेत्रा पवारांना स्पष्ट संदेश, सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी

'माझ्यासोबत काम हवं असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या'; प्रशांत किशोरांचा सुनेत्रा पवारांना स्पष्ट संदेश, सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी

मुंबई (प्रतिनिधी) : भविष्यात निवडणूक रणनीतीकार म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करावं, अशी तुमची इच्छा असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल, अशा स्पष्ट शब्दांत प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

गुरुवारी मुंबईमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची तब्बल सहा तास बैठक झाली. नुकत्याच बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव घडवून आणल्यानंतर प्रशांत किशोर मुंबईत दाखल झाले होते. पार्थ पवार यांनी त्यांना चार्टर्ड विमानाने मुंबईत आणल्याचीही चर्चा आहे.

या बैठकीदरम्यान प्रशांत किशोर यांनी थेट राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. राज्यातील नेतृत्वासोबत प्रभावी समन्वय नसताना काम करणं कठीण असल्याचं त्यांनी सुनेत्रा पवार यांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती मिळत आहे.

याआधीही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी तीन वेळा प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. त्या बैठकींमध्ये पक्षसंघटनेत काही महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले होते. मात्र, त्या सूचनांची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने नाराजी व्यक्त करत, भविष्यात एकत्र काम करायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेणं आवश्यक असल्याची भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रशांत किशोर आणि त्यांच्या टीममधील दोन सदस्य उपस्थित होते. तर जय पवार यांनी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभाग घेतल्याची माहितीही सूत्रांकडून समोर आली आहे.