शंकराचार्यांच्या भेटीनंतर उमेश पाटलांकडून पार्थ पवारांच्या विवाहाची तारीख जाहीर; गैरसमज दूर करत दिली अधिकृत माहिती

शंकराचार्यांच्या भेटीनंतर उमेश पाटलांकडून पार्थ पवारांच्या विवाहाची तारीख जाहीर; गैरसमज दूर करत दिली अधिकृत माहिती

कोल्हापूर (प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या विवाहाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही अधिकृत माहिती दिली. येत्या २९ जुलै रोजी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साध्या व कौटुंबिक वातावरणात पार्थ पवार यांचा साखरपुडा पार पडणार असून, २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामतीत त्यांचा विवाहसोहळा अत्यंत थाटामाटात संपन्न होणार आहे.

कोल्हापुरातील श्री करवीर पीठाच्या जगद्गुरु शंकराचार्यांची भेट घेतल्यानंतर उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन लग्न आणि पार्थ पवार यांची होणारी पत्नी कायनात दारा यांच्याबाबत पसरणाऱ्या अफवांचे खंडन केले.

शंकराचार्यांकडून धर्मशास्त्रानुसार मार्गदर्शन

विवाहाबाबत समाजात व्यक्त होत असलेल्या काही धार्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी उमेश पाटील यांनी शंकराचार्यांची भेट घेतली होती. वडिलांचे निधन झाल्यानंतर एका वर्षाच्या आत विवाह करावा की नाही, याविषयी शंकराचार्यांनी धर्मशास्त्रानुसार स्पष्ट मार्गदर्शन केले. या भेटीनंतर विवाहाशी संबंधित सर्व शंकांचे निरसन झाले असल्याचे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

कायनात दारा यांच्याबद्दल बोलताना उमेश पाटील म्हणाले, कायनात दारा या मूळच्या चंदीगडच्या असून सध्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावावरून आणि जन्माच्या ठिकाणावरून माध्यमांमध्ये चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात होत्या. मात्र, त्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून तोकड्या माहितीच्या आधारे त्या पसरवल्या गेल्या होत्या. या स्पष्टीकरणामुळे आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत.

 या पत्रकार परिषदेस माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीचे समन्वयक प्रवीण काळे, नगरसेवक आदिल फरास आणि प्रकाश गवंडी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.