शरद पवार गट एनडीएमध्ये जाणार? 'त्या' गुप्त भेटीवर संजय राऊतांचा मोठा खुलासा; चर्चांमागचं खरं कारण आलं समोर!
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी मध्यरात्री घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट भाजपप्रणित एनडीएमध्ये (NDA) सामील होणार का? अशा चर्चांना प्रचंड उधाण आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी जाहीर भूमिका मांडत या चर्चांमागचा सस्पेन्स संपवला आहे.

संजय राऊतांचा दावा: 'एनडीओ'सोबत जाण्याच्या चर्चा निव्वळ अफवा!
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी जयंत पाटील आणि फडणवीस यांच्या भेटीवर महत्त्वाचे भाष्य केले. शरद पवार गट एनडीएत जाणार असल्याच्या वावड्या पूर्णपणे फेटाळून लावत ते म्हणाले, "शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएबरोबर जाणार असल्याच्या चर्चा निव्वळ अफवा आहेत. या विषयावर आज स्वतः सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेणार असून त्या पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करतील."
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि 'नीट' परीक्षेवरून केंद्र सरकारवर निशाणा
काही माध्यमांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) आणि शरद पवार गट केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या येत होत्या. यावर आक्रमक पवित्रा घेत राऊत म्हणाले, "आम्ही किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी या विधेयकाला पाठिंबा देणार, हे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही याला पाठिंबा देणार नाही."
यावेळी त्यांनी देशातील मुख्य मुद्द्यांकडे लक्ष वेधत केंद्र सरकारवर टीका केली. राऊत म्हणाले की, "आज देशापुढे सर्वात गंभीर प्रश्न 'नीट' (NEET) परीक्षा पेपरफुटीचा आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आज १७ वा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. खरं तर हा देशासाठी चिंतेचा विषय असायला हवा, परंतु मीडियात वेगळ्याच चर्चा सुरू आहेत."




