'संविधान हत्या दिवस २०२५’ निमित्त आणीबाणीतील गौरवमुर्तींचे चित्रप्रदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - देशातील आणि जिल्ह्यातील आणीबाणीत कारावास भोगलेल्या गौरवमूर्तींवर आधारित चित्रप्रदर्शनाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले असून या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित केलेल्या या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते व उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी, कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, तहसीलदार स्वप्निल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
देशात सन १९७५ ते १९७७ मध्ये लागलेल्या आणीबाणी कालावधीत अनेक व्यक्तींनी लढा देताना सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला आहे. या घटनेला २५ जून रोजी ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात चित्र प्रदर्शनाच्या आयोजनासह कारावास उपभोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. हे चित्र प्रदर्शन २५ जून पासून पुढील ३० दिवस सुरू राहणार असून ते पाहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे.
या चित्रप्रदर्शनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कारावास भोगलेल्या व्यक्तींबाबतची माहिती, लोकशाहीचा इतिहास, लोकशाही बाबत घटनाक्रम, लोकशाहीचे प्राचीन काळातील टप्पे, आणीबाणी पूर्वीची, दरम्यानची व त्यानंतरची स्थिती, आणीबाणी दरम्यानच्या लोकांनी भोगलेल्या यातना यासह आणीबाणी बाबत इतर सविस्तर माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.