स्वच्छता ही सेवा (SHS)-2026 अभियानात सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत
कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “स्वच्छता ही सेवा (SHS)-2026” अभियानाचे आयोजन दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे. यावर्षीच्या अभियानाची संकल्पना “स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत” अशी असून, स्वच्छ व विकसित भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे.

या अभियानाच्या अनुषंगाने, जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती, शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक, विद्यार्थी व विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वच्छतेची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन मा. शिल्पा शशिकांत खोत, अध्यक्षा, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर अभियानाचा प्रभावी कृती आराखडा तयार करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना डॉ. जॅसमिन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी दिल्या आहेत. तसेच प्रत्येक शासकीय विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करावा आणि अभियानातील उपक्रमांची माहिती निर्धारित SHS-2026 IT Portal वर दैनंदिन स्वरूपात अपलोड करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अभियानांतर्गत लक्षित व अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता व परिवर्तन, स्वच्छ शाळा व युवकांचा सहभाग, सफाई मित्र सुरक्षा व सन्मान शिबिरे, घनकचरा व्यवस्थापन व चार प्रकारे कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती, वृक्षारोपण, “एक पेड माँ के नाम”, स्वच्छता पर्व, हरित पर्व, Waste to Wealth, Waste to Art, RRR उपक्रम आदी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
तसेच दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात येणार असून, नागरिकांनी “एक दिन, एक घंटा, एक साथ” या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छतेसाठी श्रमदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दि. 2 ऑक्टोबर 2026 रोजी स्वच्छ भारत दिवसानिमित्त विशेष ग्रामसभा व विविध स्वच्छता उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
“स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छता ही सेवा म्हणून स्वीकारून या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




