Jalgaon Crime : स्वयंपाकावरून वाद? जळगावमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

जळगाव : तालुक्यातील किनोद गावात 26 वर्षीय गायत्री ज्ञानेश्वर कोळी यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. मात्र, तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून सासू आणि नणंद यांनी गळा दाबून खून केल्याचा आरोप केला आहे. गायत्री कोळी या पती, दोन मुलं आणि सासूसोबत राहत होत्या. पती भाजीपाला विक्री करतो, तर गायत्री शिवणकाम करून हातभार लावत होती.
गुरुवारी दुपारी स्वयंपाकावरून झालेल्या वादातून सासू-नणंदने मारहाण केल्याचा आणि गळा दाबून हत्या केल्याचा तिच्या भावाचा आरोप आहे. घटनेनंतर पती, सासू आणि नणंद फरार झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असताना माहेरच्या नातेवाईकांनी दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
गायत्रीच्या पश्चात पती, मुलगा (५ वर्षे) आणि मुलगी (७ वर्षे) असा परिवार आहे. शेवटच्या माहितीनुसार जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.