अत्याधुनिक सक्शन कम जेटींग वाहनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर (प्रतिनिधी) - अत्याधुनिक सक्शन कम जेटींग वाहनाचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व सह - पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
कोल्हापूर शहरासाठी सुमारे ७ ते ८ टन आणि १८.५ टन अशी क्षमता असलेली २ यंत्रे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून मंजूर झाली आहेत. राज्यात स्वच्छ भारत अभियान व केंद्र पुरस्कृत अमृत अभियान यशस्वीपणे राबविल्यामुळे वैयक्तिक शौचालय, भूमीगत गटार, मॅनहोल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भूमीगत व्यवस्थांमध्ये देखभाल दुरूस्ती करताना गॅस गळती तसेच प्रदुषित हवेमुळे काम करणाऱ्या मनुष्यबळास रोगराई होवु नये यासाठी याचा उपयोग होणार आहे. सदरचे मशिन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पाच्या धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेला मंजूर झालेले आहे. या यंत्रापैकी सद्यस्थिती ७ ते ८ टन क्षमता असलेले १ यंत्र सद्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत आहे. तसेच १८.५ टन क्षमतेचे दुसरे संयंत्र सुध्दा कोल्हापूर महानगरपालिकेस उपलब्ध झालेले आहे.
या यंत्राणा कार्यान्वीत करण्यासाठी शासन स्तरावरून संबधित यंत्र विकसीत करणाऱ्या कंपनी बरोबर करार केलेला आहे. या कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या मनुष्यबळाद्वारे कोल्हापूर शहरातील मल वाहिन्या भूमीगत गटार व मल संकलन केंद्राची स्वच्छता करण्यात येणार आहे. शहरातील अंदाजे ८००० मॅनहोल, अंदाजे ५४ किलो मीटर मलवाहिन्या व भूमिगत गटारे आहेत. अमृत २.० अंतर्गत उपनगरे भागात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू असून यासर्व भूमीगत व्यवस्थेची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी या यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. या मशिनद्वारे दैनंदिन सरासरी 18 टन गाळ उठाव, किमान 100 मीटर पाईपवरील सक्शन खेचला जाणार आहे. हे मशीन महापालिकेला प्राप्त झाल्यामुळे शहरातील ड्रेनेज लाईन मधील गाळ या अत्याधुनिक मशिनद्वारे काढण्यास मदत होणार आहे.
यावेळी खासदार धनंजय महाडीक, शाहु महाराज छत्रपती, धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, डॉ. अशोकराव माने, राहूल आवाडे, जयंत आसगांवकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त डॉ. के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह आदी उपस्थित होते.