आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान

आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान

कोल्हापूर (प्रतिनिधी) - देशात १९७५ ते १९७७ या कालावधीत लागू असलेल्या आणीबाणीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या व्यक्तींना कारावास भोगावा लागला, त्यांच्या स्मरणार्थ लोकशाहीचा सोहळा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आला. या घटनेला आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आणीबाणीत लढा दिलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात संपन्न झाला. 

१९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील १०६ व्यक्तींनी सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी कारावास भोगला होता. या व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरविण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. जिल्ह्यातील १०६ व्यक्तींपैकी उपस्थित व्यक्तींचा सन्मान या जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात आला. तसेच प्रत्येक संबंधित तालुक्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थितांचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले आणि मानधनासंदर्भात काही अडचणी असल्यास त्या संबंधित कक्षात नोंदविण्याचे आवाहन केले. मानधन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमादरम्यान प्रभाकर गणपुले, प्रमोद जोशी, बाळासाहेब कांबळे, आनंदा पाटील, वसुंधरा मराठे, धोंडीराम पाटील, माधव देशिंगकर, महेश्वर महाबळ, वेंकटेश बिदनुर, अशोक फडणीस, स्वाती सखदेव, अरुण सोनाळकर, विद्याधर काकडे, अशोक पाटील, अरुण पानारी, अभय कुलकर्णी, वृषाली बंकापुरे, मुरलीधर आळतेकर, तुकाराम कुंभार, शिवाजीराव देशमुख-शेलार आणि भगवान मेस्त्री यांना सन्मान प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. 

यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रविण टाके, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, तहसीलदार स्वप्नील पवार, तसेच कारावास भोगलेले प्रभाकर गणपुले यांच्यासह आदी उपस्थित होते.