उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'या' वक्तव्यानं जोरदार हशा पिकला
पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष बळकट करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ आणि ‘जनसंवाद’ कार्यक्रमांच्या माध्यमातून ते कार्यकर्ते आणि जनतेशी थेट संवाद साधत आहेत. याच उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक नव्या आणि वजनदार चेहऱ्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. पूर्वी काही चुकलं, तर त्यावर पांघरूण घालायला 'साहेब' होते. आता मात्र आपल्यालाच पांघरूण घालावं लागतं!" असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

पुण्यातील शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात भाजप, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक मान्यवरांनी अजित पवार गटात प्रवेश केला. यामध्ये भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार मुरलीधर निंबाळकर, मारुती किंडरे, स्वाती चिटणीस, काँग्रेसचे रोहन सुरवशे आणि इतर अनेक महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत, या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, "जालिंदर कामठे यांना चांगलंच माहित असतं की अजितदादा आज मूडमध्ये आहेत की नाही! पण आजचा आणि मागचा अजित पवार यात बराच फरक आहे. वयानुसार आणि काळानुरूप माणसात बदल होतो, मॅच्युरिटी येते. आज आपल्याला सर्वांनी एकत्र काम करावं लागणार आहे."
गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांचं काही विधानांमुळे वादात अडकलेलं दिसून आलं आहे – मग तो आयपीएस अंजना कृष्णा यांच्या कॉलचा वाद असो किंवा "सगळं सोंग घेता येतं, पैशाचं नाही" अशा वक्तव्यामुळे उठलेली चर्चा. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतःच आपल्या चुकांची जबाबदारी स्वीकारत, "पूर्वी साहेब होते, आता आपणच जबाबदार आहोत," असं सांगत विनोदी शैलीत वातावरण हलकं केलं.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक पवार यांच्यावरही टोला लगावला. ते म्हणाले, "शिरूरमध्ये माझी भावकीच मला सोडून गेली. तो तर बिचारा पालकमंत्री होण्याचं स्वप्न पाहत होता. वाटलं सगळे दादांबरोबर गेले म्हणजे आपलं सरकार येणार! पण नंतर मी त्याला स्पष्ट सांगितलं – तू मला सोडून गेलास, आता मी पाहणार तू निवडून येतोस की नाही!"




