पाचव्या दिवशी श्री अंबाबाई देवीची श्री भुवनेश्वरी देवी रूपातील पूजा
कोल्हापूर (प्रतिनिधी) - श्री अंबाबाई देवीच्या नवरात्रीतील पाचव्या दिवशी श्री भुवनेश्वरी देवी या स्वरूपात पूजा करण्यात आली. श्री भुवनेश्वरी देवी ही दश महाविद्या पैकी एक असून ती ब्रह्मांडाची अधिष्ठात्री शक्ती मानली जाते. या दिवशी देवीचे पूजन अत्यंत भक्तिभावाने केल्यास भक्तास ऐहिक व पारलौकिक सुखांची प्राप्ती होते, असे मानले जाते.

श्री भुवनेश्वरी देवीची माहिती -
"भुवन" म्हणजे त्रैलोक्य (तीनही लोक – भूतल, आंतरिक्ष, स्वर्ग) आणि "ईश्वरी" म्हणजे अधिपती. म्हणून ती त्रैलोक्य अधीश्वरी आहे. देवीचा वर्ण लाल किंवा गुलाबी असतो. ती सिंहावर किंवा कमलासनावर बसलेली असते. चार हातांमध्ये पाश, अंकुश, अभयमुद्रा आणि वरदमुद्रा असते. ही देवी मायाशक्ती म्हणून ओळखली जाते. ती संपूर्ण सृष्टीची जननी आहे आणि जगाच्या रक्षणाची शक्ती आहे. भुवनेश्वरी देवी हे आकाशतत्त्वाचे प्रतिनिधित्व करते.
श्री भुवनेश्वरी देवीची आराधना केल्यास हे लाभ मिळतात -
- मानसिक शांती, ऐश्वर्य, प्रतिष्ठा व कौटुंबिक सौख्य लाभते.
- विवाहात अडथळे दूर होतात.
- वाणीमध्ये माधुर्य व प्रभावशक्ती प्राप्त होते.
- जीवनात सकारात्मकता व प्रगतीचे मार्ग खुलतात.




