कामगार चाळ इमारत कमकुवत झाल्याने कुटुंबांनी स्थलांतरीत होण्याचे प्रशासनाचे आवाहन

कामगार चाळ इमारत कमकुवत झाल्याने कुटुंबांनी स्थलांतरीत होण्याचे प्रशासनाचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - छत्रपती संभाजीनगर कामगार चाळ मध्ये महापालिकेचे सर्व कामगार व त्यांचे कुटुंब राहते. आज छत्रपती संभाजीनगर येथील कामगार चाळ ब मधील धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला. याची माहिती प्रशासनास मिळताच प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार तातडीने सकाळी अति.आयुक्त राहुल रोकडे, सहा.आयुक्त स्वाती दुधाने, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, स्ट्रॅक्चरलर ऑडीटर प्रशांत हडकर, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जागेवर पाहणी केली.

या ठिकाणी 5 धोकादायक इमारती व 2 बैठ्या इमारती असून येथे 37 कुटुंबे राहतात. सन 2014 पासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कामगारांना दरवर्षी नोटीसा दिल्या आहेत. परंतु तरी देखील या इमारती कामगारांनी रिकाम्या केल्या नाहीत. या ठिकाणी आज सकाळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी कामगारांच्या प्रतिनिधींशी व कर्मचा-यांशी समक्ष चर्चा केली. या चर्चेमध्ये सदरची इमारत कमकुवत झाली असल्याने येथे राहणे धोक्याचे असल्याचे सांगण्यात आले. या इमारतीत जीवीतास धोका असून आपण कोणतीही दुघर्टना घडण्या अगोदर या इमारती खाली कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.

त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने कामगारांचे मासिक वेतनातून घरभाडे पोटी होणारी कपात या खोल्या रिकाम्या केलेवर लगेच थोपविण्यात येणार असलेची हमी देण्यात आली. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेमधून किंवा अन्य शासनाच्या योजनेतून या ठिकाणी नविन इमारत बांधणे बाबत दोन दिवसामध्ये डि.पी.आर सादर करणे बाबत शहर अभियंतांना सुचना देण्यात आल्या. सद्या प्रत्यक्ष वास्तव्यास असणाऱ्या कामगारांनी खोल्या खाली करुन रितसर लेखी अर्ज इस्टेट विभागाकडे देण्यात यावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.